बोहाडा
बोहाडा उत्सव मोखाडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. बोहाडा उत्सवाला अडीचशे वर्षाहून मोठी परंपरा आहे. ह्या उत्सवात आदिवासी बांधव कलाकार आपल्या डोक्यावर विविध देवदेवतांचे मुखवटे घालतात आणि अन्य कलाकारवाजंत्री आणि संबळ वाजवतात. त्या तालावर मुखवटे घातलेले कलाकार नाचतात. त्यांना अन्य आदिवासी बांधव नाचण्यासाठी मदतही करतात.हे मुखवटे आदिवासी कलाकार उंबर, साग ह्या लाकडापासून स्वतः तयार करतात. ‘बोहाडा’ हा शिमगा उत्सवासारखा आदिवासी संस्कृतीचा एक भाग असतो. वारली कलेप्रमाणे हस्तकौशल्य वापरून लाकडात कोरीव काम केले जाते. हे मुखवटे आदिवासींच्या परंपरागत देवता तसेच रामायण, महाभारत ह्यातील देवता ह्यांचे बनविले जातात. या उत्सवात देव, देवी, दैत्य, हिंस्त्र श्वापदे, ऐतिहासिक व पौराणिक व्यक्ती यांची सोंगे घेत पुराणकथा सादर केल्या जातात. गणपती, सरस्वती, रक्तादेवी, कालिका, दैत्य, राम, रावण, हनुमान अशी कितीतरी सोंगे घेतली जातात. मुखवटे व त्यांबरोबरच प्रभावळी बांधून ही सोंगे नाचत मंडपात, दरबारात येऊन सूत्रधार, गाडीवान यांच्या सहकार्याने पुराणकथा सादर करतात. या उत्सवांत सामान्यतः उत्सव सांगतेच्या आदल्या रात्रभर सोंगे नाचविण्याची प्रथा आहे. या उत्सवास भवाडा, लळीत असेही म्हणतात. देवीच्या आवाहनापासून सांगतेपर्यंत पूजाअर्चा, वारी घेणे (अंगात संचार होणे ) यांबरोबरच विधिनाट्यात्मधारणेसह लोकनाट्य तमाशा सादर करण्याची प्रथा आहे.