निसर्गात दडलेले – श्रीक्षेत्र सरोवर तीर्थ आदीनाथ शिवमंदिर ओसरविरा
जव्हारहुन नाशिक येथे जाताना राष्ट्रीय महामार्ग १६०अ वरील मोरचुंडी घाटाच्या थोड पुढे गेल्यावर डावीकडे एक जोडमार्ग आपल्याला ओसरविरा ह्या छोट्याशा गावात घेऊन जातो. गर्द निसर्गाच्या कुशीत वसलेले हे गाव जागृत स्वयंभू शिवमंदिरासाठी प्रसिध्द आहे. मंदिरासमोरच एक छोटेसे कुंड आहे. ह्या कुंडात संपूर्ण वर्षभर पाणी असते. प्राचीन काळापासून येथे शिवलिंग आहे व जागृत समजल्या जाणाऱ्या ह्या देवस्थानाचा अनुभव अनेक शिवभक्तांना आल्याचे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी येथे यात्रा भरते व वारली, कोकणा, कातकरी समाजाची लोकवस्ती असलेले हे गाव शिवभक्तांनी गजबजून जाते.
ओसरविरा तीर्थ क्षेत्र हे मोखाडा तालुक्यातील व बेरिस्ते ग्रामपंचायत परिसरातील प्रसिद्ध जागृत देवस्थान आहे. या तिर्थाबद्द्ल सांगावे असे विशेष म्हणजे ओसरविरा गावाच्या वरील परव्त डोंगर टेकड्या गोल परिघातील शिवपिंडी आकारातील बसलेले हे ठिकाण आहे. हे सरोवर तीर्थ आदिनाथ शिवमंदिर अति प्राचिन काळापासुन आहे ते कोणी माणसाने याची स्थापना केलेली नाही. त्र्यंबकेश्वर हे 12 ज्योतीर्लिंगापैकी प्रसिद्ध शिव ज्योतिर्लिंग आहे. त्र्यंबकेश्वर येथील जोतीर्लिंगाची उत्पत्ती झाली त्याच कालावधीत या ठिकाणाचा उल्लेख हा त्या काळातील शिव व विष्णु भगवान पुरणातील दुस-या अध्यायामध्ये या ओसरविरा सरोवर शिव मंदिराचा उल्लेख आहे. त्याकाळी या तीर्थावर ऋषीमुनी यांनी मोठी तपचर्या केलेली आहे. या ठिकानाचा महिमा माता गंगेप्रमाणेच आहे. भगवान शंकर प्रभुंना एकांत असा त्रीवेणी संगम घडवुण आणलेला आहे.