मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

  • Start Date : 11/09/2025
  • End Date : 30/09/2025

ग्रामविकास व पंचायतराज विभाग, जिल्हा परिषद पालघर तथा पंचायत समिती मोखाडा यांच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन राघोजी भांगरे सभागृह, पंचायत समिती मोखाडा येथे दि. 11 सप्टेंबर 2025 रोजी मोठ्या उत्साहात पार पडले. 

या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती मोखाडा चे प्रशासक तथा गटविकास अधिकारी अक्षय पगार होते. यावेळी व्यासपीठावर श्री. प्रकाश निकम (माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, पालघर), श्री. प्रदीप वाघ (मा. उपसभापती, प. स. मोखाडा), श्री. मिलिंद झोले, श्री.संतोष चोथे, श्री.सुनिल पाटील (विस्तार अधिकारी ग्रामपंचायत), तसेच श्री.प्रसाद पाटील (संचालक, स्वदेश फाऊंडेशन), सर्व खाते प्रमुख अधिकारी / कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर गटविकास अधिकारी अक्षय पगार यांनी अभियानाची पार्श्वभूमी, उद्दिष्टे, विविध घटक, कालावधी तसेच ग्रामपंचायती व संबंधित यंत्रणांची भूमिका याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. विस्तार अधिकारी यांनी सरपंच, उपसरपंच , ग्रामपंचायत कर्मचारी, रोजगार सेवक व ग्रामपंचायत केंद्र चालक अभियानाचे प्रत्यक्ष कार्यान्वयन कसे करावे, याविषयी माहिती दिली.

यानंतर स्वदेश फाऊंडेशनचे संचालक प्रसाद पाटील यांनी ग्रामीण विकासासाठी संस्थेने सुरू केलेल्या उपक्रमांची माहिती दिली व ग्रामविकास प्रक्रियेत सामाजिक संस्थांच्या सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले. या कार्यशाळेसाठी तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, पेसा मोबाईलायझर, ग्रामरोजगार सेवक तसेच पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेमुळे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान तालुका पातळीवर अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी दिशा मिळाल्याचे समाधान उपस्थितांनी व्यक्त केले.